Sushilkumar Shinde: माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसबद्दल स्पष्ट मत मांडलं

0

दि.३०: काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी काँग्रेस पक्षाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. नुकत्याच पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नेतृत्वावरुन वाद रंगला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना पक्षाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली असं सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत संवाद झाला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मुलाखतीदरम्यान सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मात्र गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीने नेतृत्व करण्याच्या मुद्यावर भाष्य करणं टाळलं.

राहुल, प्रियंका यांच्याशी काय चर्चा होते असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमच्या जेव्हा बैठका होतात त्यावेळी बोलतो. पण गेल्या तीन-चार वर्षात आमची भेट झालेली नाही. कारण मी गेलो नाही. मला सोनिया गांधी आणि राहुल, प्रियंकाही बोलवतात पण आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही. आता नव्या पिढीच्या हातात सगळं सोपवलं आहे”.

“आम्ही जे बोलत असतो ते काँग्रेस अध्यक्षांशी बोलत असतो. बाकीचे सगळे खासदार, कार्यकर्ते यांना बोलून जास्त काही होत नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी आमचे नेते आहेत, त्यांच्याशी बोलणं होत असतं,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“आम्ही सर्वजण गांधी कुटुंबाला स्वीकारणारे आहोत. त्या घराण्यातून आलेल्या लोकांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. ते कोणी करावं हे कमिटी ठरवेल,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. “गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल,” असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

“२०१४ नंतर मोदींसारखा आक्रमकपणे प्रचार करणारा मोदींसारखा नेता देशाला मिळाला. लोक त्यांच्या प्रचाराच्या भाषेमुळे, वकृत्वामुळे लोक वाहवत गेले. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. पाच वर्षात हे करु, ते करु सांगितलं होतं. मोदींनी सोलापुरातून सैन्यासाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होत. मात्र एकही रुपयाचा कपडा घेतला नाही. खोट्या प्रचाराला लोक भुलले आणि आता त्यांना कळू लागलं आहे,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

“तरुणांकडे नेतृत्व द्यायचं, बदल करायला सांगायचं असा प्रयत्न करुन पाहिला आणि तिथेच गफलत झाली, असं मला वाटत. मात्र मी पक्षावर अशी थेट टीका करू शकणार नाही. कारण ही प्रक्रिया आहे. आम्ही १० वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही इतके सक्रीय नव्हतो. संघटना बांधणी व्हायला हवी होती ते झालं नाही,” अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

“एकट्या राहुल गांधींना दोष देणं शक्य नाही. तरुणांच्या हातात दिलं पाहिजे असं सर्वांना वाटत होतं. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता,” असं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here