सोलापूर,दि.२१: सुशील कराड विरूद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फिर्याद प्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. यात हकीकत अशी की, सोलापूर येथील महिला व तिचा पती व तिचे दोन मुले हे परळी येथे राहण्यास होते. परळी येथे राहत असताना तिचा पती हा सुशील वाल्मीक कराड यांच्या ट्रेडर्स मध्ये कामास होता. सुशील कराड हा तिच्या पतीस तू दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा कसे काय कमावला म्हणून मारहाण करून रिवाल्वरचा धाक दाखवून तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी हे स्वतःच्या ऑफिसला मागवून घेऊन त्याच्या चाव्या व कागदपत्रे स्वतःकडे ठेऊन घेतले.
पीडीतेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून बळजबरीने घरातून उचलून नेऊन कोणतेही पैसे न देता खरेदी केला, तसेच तिचे लहान मुलीस मारहाण केली, तसेच तिच्या पतीचे अडीच तोळ्यांचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्सला बळजबरीने विकायला लावले व त्याचे आलेले पैसे सुशील कराड याने घेतले, जीविताच्या भीतीपोटी सोलापूरला आल्यावर देखील गोपी गंजेवार हा इतर साथीदारा समवेत पीडितेच्या सोलापूर येथील घरी येऊन तिस धमकी देऊन शिवीगाळ केली.
यातील आरोपी सुशील कराड याने पीडिता परळीत राहत असलेल्या घरमालकाचे मोबाईल वरून पिडीतेस अश्लील भाषेत शिवीगाळ केली, अशा आशयाची तक्रार वजा सविस्तर फिर्याद पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली, त्यांनी फिर्यादीची दखल घेतली नाही म्हणून तिने पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार केली, परंतु पोलीस आयुक्त, सोलापूर यांनी देखील दखल घेतली नाही.
त्यावर महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त, सोलापूर व पोलीस अधीक्षक, बीड यांचेकडे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रजिस्टर पोस्टाने तक्रार तसेच तक्रारीच्या अनुषंगाने असलेले कागदपत्रे पोस्टाने पाठवून दिली, तरी देखील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही, त्यावर सदर महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद वजा तक्रार दाखल करून त्याप्रमाणे विविध कलमान्वये पोलिसांना सुशील कराड, अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश पारित करण्याची विनंती केली.
आज जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी घटना या न्यायालयीन स्थळसिमेत घडलेल्या नसून परळी, जिल्हा बीड येथे घडललेल्या आहेत त्यामुळे पीडितेने परळी येथील योग्य त्या न्यायालयात दाद मागावी व दाखल केलेली फिर्याद पीडितेस परत केली असा आदेश पारीत केला.
यात पीडिते तर्फे ॲड.विनोद सूर्यवंशी, ॲड. श्रीकांत पवार, ॲड. मधुकर व्हनमाने यांनी तर तर्फे यात आरोपी सुशील कराड तर्फे अॅड. संतोष न्हावकर व अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे यांनी काम पाहिले.