मुंबई,दि.9: Survey On NCP: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. शिंदे नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर व चिन्हावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीवर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एक सर्वे केला आहे. यातील निष्कर्ष आश्चर्यजनक आहेत. (Survey On NCP)
शरद पवार पक्षाला उभारी देतील? | Survey On NCP
शरद पवार महाराष्ट्रात फिरून पुन्हा पक्ष उभारू शकतात का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवारांना असे करणे शक्य होईल का,असे तुम्हाला वाटते का? यावर 57 टक्के लोकांनी ‘हो’ तर 37 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. उर्वरित 6 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा?
एबीपी न्यूज-सी व्होटरच्या या सर्वेत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वेत सहभागी झालेल्या 66
टक्के लोकांनी शरद पवार हेच पक्षाचे खरे अध्यक्ष असल्याचा कौल दिला. तर, 25 टक्के लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा पक्ष असल्याचे वाटते. 9 टक्के लोकांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.
बंडामागे शरद पवारांचा हात?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली. अजित पवार यांनी पक्षावर दावा केला असून स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार यांचे बंड ही शरद पवारांचीच खेळी आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबतही सर्वेक्षणात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अजित पवारांनी केलेल्या बंडामागे त्यामागे शरद पवार आहेत का? असा प्रश्न सर्वेत विचारण्यात आला होता. प्रश्नावर आश्चर्यकारक उत्तरं मिळाली आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के लोकांनी अजित पवारांच्या या खेळामागे शरद पवार असल्याचे सांगितले. तर 49 टक्के लोकांनी शरद पवार यांचा हात नसल्याचे स्पष्ट केले. तर,14 टक्के लोकांनी माहिती नाही असे उत्तर दिले.
सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्रात 1 हजार 790 लोकांशी चर्चा करण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.