पुणे,दि.२५: Supriya Sule On NCP: राज्याच्या राजकारणात जी संभ्रमावस्था झालीय त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार अध्यक्ष आहेत, महाराष्ट्रात जयंत पाटील अध्यक्ष आहेत. २४ वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने नेहमी संविधानाच्या चौकटीत राहून केला आहे. आम्ही केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षातच आहोत असा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. अजित पवार आमचेच नेते या विधानावरून राज्याच्या राजकारणात जी संभ्रमावस्था झालीय त्यावर सुळेंनी भाष्य केले.
संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे | Supriya Sule On NCP
अजित पवार कुठल्या पक्षाचे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षातील ९ आमदार आणि २ खासदार यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. जो आमच्या पक्षाच्या विचारधारेला पटणारा नाही. त्यावर आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही पत्र लिहिले आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. पक्षाच्या विचारधारेच्या चौकटीत तो निर्णय बसत नाही हे आम्ही कळवले आहे. इतकी पारदर्शक भूमिका आम्ही घेतली आहे. संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले.
अजित पवारांचे नेतृत्व…
त्याचसोबत अजित पवारांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला मान्य आहे. सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात. वेगवेगळ्या पक्षात असले तरी कामाच्या पद्धतीवरून नेतृत्व मान्य केले जाते. पहिल्या सभेत अनेक नेते विरोधात बोलले. त्यांच्या टीकेचं वाईट वाटले. त्यानंतर बऱ्याच गोष्टीचे स्पष्टीकरण आले आहे. त्याच त्याच गोष्टी बोलून महागाई, बेरोजगारी कमी होणार नाही. कांद्याला भाव मिळणार नाही. दुष्काळ तातडीने जाहीर झाला पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी सातत्याने आम्ही करतोय असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
दरम्यान, मी अनेक भाषणात सरकारच्या विरोधात बोलतेय, त्यामुळे माझ्याबद्दल कुणाच्या मनात संभ्रम नसेल. माझी लढाई वैयक्तिक नाही पण धोरणे, निर्णय यांच्याविरोधात माझी लढाई आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी ज्यारितीने त्यांच्या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री जपानमधून ट्विट करतात तर दुसरे मंत्री दिल्लीत भेट घेतात त्यांनाच काही माहिती नसते. केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकार यांच्यात संवाद नाही. जपानमधून उपमुख्यमंत्री माहिती देतात ती राज्यातल्या कृषीमंत्री यांना माहिती नसते असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.