सोलापूर,दि.९: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात पहिल्यांदाच अजित पवारांसह सर्व नेत्यांना इशारा दिला आहे. इथं एकच हिरो आहे, बाकी काय कामाचे नाहीत. स्वत:च्या मतदारसंघात काय होईल सांगता येत नाही. ते फक्त शरद पवारांवर डाफरून स्वत:चे महत्व तयार करतायेत. वयाने मोठे आहात म्हणून तुमचा मान सन्मान ठेवतेय, गुण्या गोविंदाने राहा. शरद पवारांवर टीका करू नये. ज्यादिवशी पवारांवर टीका कराल, एकदा, दोनदा, तीनदा ऐकून घेईन पण चौथ्यांदा करारा जबाब मिळेल ज्यानं तुम्हाला मतदारसंघात फिरणे मुश्किल होईल अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच अजित पवारांसह सर्व नेत्यांना इशारा दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी स्वाभिमानी मुलगी आहे. माझे कुटुंब फक्त दादा आणि मी नाही तर तुम्ही सगळे आहात. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर कुटुंब आहे. ही प्रेमाच्या नाती आहेत. उभं आयुष्य कार्यकर्त्यांनी शरद पवारांवर प्रेम केले. अनेकांना तिकीट मिळाले नाही तरी विश्वास, प्रेम ठेऊन आयुष्यभर राजकारण केले. शरद पवारांचे इतके भाग्य की सर्वांकडून त्यांना प्रेम मिळाले. हे कंत्राटी प्रेम नव्हते तर पर्मंनंट प्रेम होते. महाराष्ट्र सरकार हे कंत्राटी आहे. शासकीय नोकरी कंत्राटीवर जीआर काढलाय. कंत्राटावर आरक्षण मिळतं का? आरक्षण बंद करणार का? आरक्षण बंद करण्याचे कटकारस्थान खोके सरकार करतंय असा आरोप त्यांनी केला.
NCP कुणाची तर ती शरद पवारांची पार्टी
तसेच मी तुम्हाला ५ कलमी कार्यक्रम देणार आहे. २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. अदृश्य शक्तींनी ४ मराठी माणसांवर अन्याय केला, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी. या चौघांवर अन्याय केला, नितीन गडकरींचे अधिकार कमी केले, देवेंद्र फडणवीस दहापैकी दहा होते त्यांना अडीचवर आणले. शरद पवारांना हुकुमशाह म्हणाले, पक्ष, चिन्ह काढून घेतले. तुम्ही कितीही म्हटला तरी काश्मीर ते कन्याकुमारी कुणालाही विचारा, NCP कुणाची तर ती शरद पवारांची पार्टी आहे असंही सुप्रिया सुळेंनी ठणकावले.
मागितले असते तर माझ्या भावाला…
दरम्यान, पक्ष आम्हाला मिळणार हे सांगितले जाते, याचा अर्थ त्या अदृश्य शक्तीने तुला पक्ष मिळणार आहे हे सांगितले आहे. बायकांच्या नादी लागू नका, तो शरद पवार…असं बोलतात, आज वकिली कर, आज ना उद्या तुझा नाही करेक्ट कार्यक्रम केला तर शरद पवारांची पोरगी सांगणार नाही. शरद पवार स्वत: निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर राहिले. निवडणूक आयोगाची पहिली नोटीस तिकडून आली, आपण पाठवली नाही. ८३ वर्षाचा माणूस दिल्लीला जाऊन स्वत: बाळाला ज्याला जन्म दिलाय त्या पक्षासाठी निवडणूक आयोगासमोर जाऊन बसले, ज्याला पक्ष हवा होता ते होते का? कोणी आलं नव्हते. वकील आला होता, त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. माझा स्वभाव असा नव्हता, मागितले असते तर माझ्या भावाला सर्व दिले असते. दिलदार आहे मी, शून्यातून माझे विश्व उभे केले असते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.