सोलापूर,दि.९: जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील हे अजित पवार गटात गेल्यास त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असंही बोललं जात आहे.
या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, असं मिश्किल वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अजित पवार गटाकडे गेल्यास जयंत पाटलांना मुख्यमंत्री केलं जाईल, या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “वाह… वाह… चांगली गोष्ट आहे. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल.” सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर स्वत: जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागली आहे. इकडून तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री… तिकडून इकडे आल्यावर मुख्यमंत्री… इकडे दोन-तीन मुख्यमंत्री… तिकडे दोन-तीन मुख्यमंत्री… आणि रांगेत आणखी बरेच मुख्यमंत्री… त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल, असं मला वाटतं” अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली.