नवी दिल्ली,दि.19: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार सध्या फक्त घड्याळ हेच चिन्ह वापरणार असल्याचे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह न देण्याची शरद पवारांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. अजित पवार यांना घड्याळ चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आता कायम राहणार आहे. मात्र, आताच्या प्रकरणात शरद पवार गटालाही दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांना लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने हे निवडणूक चिन्ह शरद पवार गटासाठी राखून ठेवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ते इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये, असे न्यायालयाने आदेश दिले.
तसेच अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये जाहीर नोटीस जारी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. घड्याळ चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असल्याचे नोटीसमध्ये नमूद करावे लागेल. पक्षाला आपल्या प्रचारात पॅम्प्लेट आणि ऑडिओ-व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातूनही ही माहिती द्यावी लागणार आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून घड्याळ हे पक्षचिन्ह त्यांच्यासोबत होतं. मात्र आता ते निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाने दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबतची नोटीस सार्वजनिक करण्याचे आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिले आहेत.