नवी दिल्ली,दि.19: पतंजली आयुर्वेद या आयुर्वेदिक कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू रामदेव बाबा यांना नोटीस बजावली असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. रामदेव यांच्यावर अवमानाची कारवाई का सुरू करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने रामदेव बाबा यांचे वकील मुकुल रोहतगी यांना विचारले की, तुम्ही अद्याप उत्तर का दाखल केले नाही? आता आम्ही तुमच्या क्लायंटला कोर्टात हजर राहण्यास सांगू. रामदेव यांनाही पक्ष बनवू. रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
आम्ही या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. यासोबतच न्यायालयाने केंद्रीय आयुष मंत्रालयाला फटकारले आणि एक दिवस आधी उत्तर का दाखल केले? त्यावर केंद्राने न्यायालयाला सांगितले की, त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी आणखी वेळ हवा आहे.
पतंजलीच्या व्यवस्थापकीय संचालकांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच स्वामी रामदेव यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला का चालवू नये, अशी नोटीसही न्यायालयाने बजावली आहे.
याआधी सुप्रीम कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदला न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली होती. पतंजली आयुर्वेद व्यतिरिक्त आचार्य बाळकृष्ण यांनाही नोटीस देण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांना तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले होते. मात्र याचे उत्तर मिळाले नाही.