नवी दिल्ली,दि.29: राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी काल (दि.28) भाजपा नेत्यांची बैठक झाली. यानंतर या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपाने राज्य सरकार अल्पमतात असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.
शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना ॲड. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, “न्यायालयासमोर निकालाची वाट पाहत असताना, नुकतेच कोविडमधून बरे झालेले राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्टची मागणी कशी करू शकतात?”
फ्लोअर टेस्ट टाळणं योग्य नाही
अनेकदा सत्ताधारी बहुमत चाचणी लवकर व्हावी यासाठी न्यायालयाकडे धावाधाव करतात. परंतु क्विचतच असं पाहतोय की पक्ष बहुमतापासून दूर पळतेय, कौल यांचा युक्तीवाद. सर्वोच्च न्यायालयाचे जुने दाखले दिले. अपात्रतेचे निर्णय प्रलंबित आहे म्हणून फ्लोअर टेस्ट टाळणं योग्य नाही. दोन्ही गोष्टी निराळ्या असे ॲड. नीरज कौल म्हणाले.
शिवसेनेचे वकील आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला आहे. राज्यपाल यांच्यावतीनेही वकिलांनी आपले म्हणणे मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद संपला असून रात्री 9 वाजता निकाल येणार आहे.