नवी दिल्ली,दि.23: सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र करण्याची केलेली मागणी अमान्य केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे तसेच भरत गोगावले पक्षाचे प्रतोद असल्याचा निकाल दिला. यामुळे भरत गोगावले यांनी काढलेला व्हीप पाळणे बंधनकारक होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ठाकरे गटाला मान्य नाही.
ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान दिले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (दि.22) सुनावणी झाली. न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 समर्थक आमदारांना नोटिसा जारी केल्या असून, दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार अपात्रताप्रकरणी नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने 15 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.
भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 8 फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सिब्बल यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. पण, उच्च न्यायालयात गेल्यामुळे कालापव्यय होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे समर्थक 39 आमदारांना नोटिसा जारी कराव्यात, अशी मागणी सिब्बल यांनी केली. त्यानुसार या आमदारांना नोटिसा बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.