सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना विचारले – कुठे आहात तुम्ही?

0

नवी दिल्ली,दि.19: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक करून कारवाई केली. मात्र अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह (Param Bir Singh) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सध्या संरक्षण मिळणार नाही, जोपर्यंत ते कुठे आहेत हे सांगणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही देशात आहात का? तुम्ही देशाबाहेर आहात का? न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले- तुम्ही कोणत्याही तपासात सहभागी झाला नाही. तुम्ही संरक्षण आदेश मागत आहात.

आमची शंका चुकीची असू शकते पण तुम्ही परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही ते कसे देणार? 22 नोव्हेंबरला परमबीर कुठे आहे ते सांगा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर परमबीरच्या वतीने सांगण्यात आले की, जर मला श्वास घेऊ दिला तर मी खड्ड्यातून बाहेर येईन. याप्रकरणी पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.

मुंबई न्यायालयाने फरार घोषित करण्याची परवानगी दिली होती

यापूर्वी मुंबई न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता मुंबई पोलीस त्यांना वाँटेड आरोपी म्हणून घोषित करू शकतात आणि प्रसारमाध्यमांसह संभाव्य सर्व ठिकाणी त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. माहितीनुसार- 30 दिवसांत ते समोर आले नाहीत, तर मुंबई पोलिस त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतील.

एका बिल्डरने 15 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता

22 जुलै रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, अन्य पाच पोलीस कर्मचारी आणि अन्य दोघांविरोधात एका बिल्डरकडून 15 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी परस्पर संगनमताने तक्रारदाराच्या हॉटेल आणि बारवर कारवाईचा धाक दाखवून 11.92 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाल्यानंतरही त्यांचा अजून पत्ता नाही.

अनिल देशमुख यांच्यावर केले होते आरोप

परमबीर सिंह यांनी मुंबईचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी देशमुख यांच्यावर हस्तक्षेप करून पोलिसांचा वापर करून दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. मुकेश अंबानी बॉम्ब प्रकरणातील संथ तपासासाठी पदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी हे पत्र लिहिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here