काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण
सोलापूर,दि.25 : विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी जिद्द आणि परिश्रम आवश्यक आहे. ध्येयासाठी सुखाचा त्याग केला पाहिजे. न्यूनगंड न बाळगता कोणतेही क्षेत्र निवडा. त्यात उत्तम कामगिरी करा. टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडिया यापासून दूर राहा. तुमच्यापासून यश दूर नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन, काशीपीठ, जंगमवाडी मठ, वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सोना शंकर ज्ञानविकास ट्रस्टचे अध्यक्ष कुमार करजगी, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान वाराणसी येथून श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी ऑनलाइन आशीर्वचन दिले. ते म्हणाले की विद्यार्थी अवस्था ही सर्वात सुंदर व श्रेष्ठ अवस्था आहे. ती व्यक्तीच्या जीवनाची पहिली पायरी आहे. विद्यार्थी जीवनातच संस्कार रुजविले जातात. जन्मानंतरच नाही तर जन्माअगोदर पासून म्हणजे गर्भातदेखील व्यक्तीचे शिक्षण सुरू असते. विद्याधन हे सर्वात श्रेष्ठ धन आहे. ते स्वतःहून संपादन केल्याशिवाय प्राप्त होत नाही. विद्यामुळे स्वतःबरोबर इतरांनाही सुखी ठेवता येते. आम्ही स्वतः शिष्यवृत्ती घेऊनच शिकलो. त्याचा योग्य विनियोग करून अनेक पदव्या व सुवर्णपदके प्राप्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा उपयोग करून आपले आयुष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोलापूर शहरातील 18 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित 382 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केली जाते.
याप्रसंगी सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, बाबुराव मैंदर्गीकर, बसवराज शास्त्री, शिवयोगी होळीमठ, महेश अंदेली, शांता मरगुर, अंजली तिवारी, देणगीदार विजयकुमार भोगडे, प्रमिला नंदगावकर, निवृत्ती गायकवाड, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंबंधी माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत सिद्धय्या स्वामी-हिरेमठ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी तर आभारप्रदर्शन शिष्यवृत्ती विभाग सहाय्यक राजशेखर बुरकुले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र निंबर्गीकर, चिदानंद मुस्तारे, योगेश दुधाळे आदींनी परिश्रम घेतले. काशीपीठाच्या फेसबुक पेजवरून संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.