सोलापूर,दि.12: मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर (Mumbai-Chennai Express) दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून रेल्वेवर दगडफेकीची आणखी एक घटना समोर आली आहे. 10 दिवसांच्या आत हे दुसरे प्रकरण आहे. सोलापूर विभागातील पारेवाडी ते वाशिंबे दरम्यान मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.
या घटनेत मोठी हानी झाली नसून ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून काही जणांना किरकोळ दुखापतही झाली आहे. रेल्वेवर दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत 10 दिवसांत दगडफेकीच्या दोन घटनांमुळे आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक
काही दिवसांपूर्वीच वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे स्थानकाजवळ येताच अज्ञातांनी अचानक दगडफेक सुरू केली. ट्रेनच्या सी-11 कोचला लक्ष्य करण्यात आले. आता अज्ञात हल्लेखोरांनी मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसवर दगडफेक केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रेनवर दगडफेक होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत आणि बहुतेक हल्लेखोर वंदे भारत ट्रेनला लक्ष्य करतात.