नातेवाईकांना भेटण्यासाठी चालकाने पळवली एसटी बस

0

सोलापूर,दि.२३: नातेवाईकांना भेटण्यासाठी एसटी बस (ST Bus) पळविल्याची घटना सोलापुरात घडली आहे. शनिवारी (दि.२०) सायंकाळी सोलापूर एसटी स्थानकातून (Solapur ST Station) वीस वर्षे सुरक्षित सेवा केलेल्या शरणप्पा बेनुरे या चालकाने मद्यधुंद अवस्थेत एसटी गाडी पळवली. याप्रकरणी बेनुरे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शरणप्पा बेनुरे दारूच्या नशेमध्ये नातेवाइकांना भेटण्यासाठी एसटीने तेलगाव गेल्याची माहिती तपासात मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे सर्व एसटी गाड्या बंद आहेत; पण नातेवाइकांना भेटण्यासाठी आरोपी बेनुरे याने दारूच्या नशेमध्ये चक्क एसटी गाडी घेऊन तेलगाव येथील पाहुण्यांच्या घरी भेटायला गेला.

हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गाडीचा शोध सुरू केला. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्या चालकाला तेलगाव गावाजवळ पकडले. त्याला मंद्रुप पोलिसांनी फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे हे करत आहेत.

एसटी गाड्यांच्या चालकांकडे एक मास्टर चावी असते. या मास्टर चावीने बेनुरे याने गाडी काढली व थेट मंद्रूपमार्गे तेलगावकडे निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याचा शोध घेत ही गाडी अडवली. त्यानंतर रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, त्या एसटी चालकाची चौकशी होणार असून त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here