सोलापूरकरांची पद्धतच न्यारी म्हणून सोलापूरकर ठरले सगळ्यात भारी

0

बसवेश्वर बेडगे/सोलापूर,दि.24 : सोलापूर शहरात ठिकठिकाणी कामे सुरू असल्याने रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. सोलापूर शहराचा स्मार्ट शहराच्या यादीत पहिल्या 10 मध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे शहराचा लवकरच कायापालट होईल अशी नागरिकांना आशा होती. सोलापूर शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना खड्याचा अंदाज येत नाही. खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होतात. शहरातील अनेक नगरातील रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवार आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांचे काय होते हे सर्वश्रुत आहेच.

सोलापूर महानगरपालिकेला जुळे सोलापुरातून सर्वाधिक टॅक्स मिळतो आहे. जुळे सोलापूर शहरातील सर्वाधिक रहिवाशी वेळेत टॅक्स भारतात. मात्र नागरिकांना त्याप्रमाणात सुविधा मिळत नाहीत. जुळे सोलापूर, विजापूर रोड परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

सोलापुरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. या खड्ड्यात पाणी भरल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याची एव्हढी दुर्दशा होऊनही नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या वेदना नगरसेवकांना समजत नसतील तर त्यांचा काय उपयोग अशी भावना या परिसरातील नागरिकांची झाली आहे.

सोलापुरातील एका परिसरातील नागरिकांनी आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या याचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोलापुरातील एका परिसरात नागरिकांनी फलक लावून लोकप्रतिनिधींना चांगलेच खडसावले आहे. या परिसरात पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे, त्या शेजारी “जाहीर विनंती, येत्या मनपाच्या निवडणुकीत मतदान करताना, या खड्ड्याची आठवण ठेवा” असा फलक लावला आहे. शहाण्यांना शब्दाचा मार म्हणतात, आता तरी लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापूरकरांच्या या फलकामुळे (पाटी) सोलापूरकर पाट्या लावण्यात सगळ्यात भारी ठरले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here