सोलापूर, दि.1: Solapur Update: सोलापूर शहरात आज (बुधवार) पासून सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत दिवसभर जड वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शहरांमध्ये जड वाहतुकीमुळे निष्पाप मुलांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. माने यांनी मंगळवारी सायंकाळी जड वाहतुकीबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत शहरात प्रवेश करण्यास परवानगी | Solapur Update
नवीन आदेशानुसार जड मालवाहू वाहनांना देगाव नाका, नवीन होटगी नाका, नवीन विजापूर नाका, नवीन अक्कलकोट नाका, जुना तुळजापूर नाका, मार्केट यार्ड येथून रात्री नऊ ते सकाळी सात या कालावधीत शहरात प्रवेश करण्यास व वाहतूक करण्यास परवानगी राहील. या कालावधीत वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा 40 किमी प्रतितास राहील.
या मार्गावर पूर्णपणे बंदी | Solapur News
त्याप्रमाणे जुना पुणे नाका ते निराळे वस्ती या मार्गावर जड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहणार आहे. तसेच जुना पुणे नाका ते शिवाजी चौक मार्गे भैया चौक या मार्गावर जड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीस सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बंदी राहणार आहे.
जड मालवाहू वाहनांच्या बंदी आदेशातून पुढील प्रकारच्या वाहनांना अटी घालून शिथिलता देण्यात आली आहे. रेल्वे मालधक्का सोलापूर येथून माल घेऊन जाणाऱ्या जड मालवाहू वाहनांसाठी वाहतूक बंदी कालावधीत मालधक्का ते मंगळवेढा याच रस्त्याने जाण्यास व येण्यास परवानगी असेल.
वाहनांचा वेग ताशी 20 किलोमीटर…
मालधक्का येथे येणारा धान्यसाठा घेऊन जाणाऱ्या जड वाहनांना रामवाडी गोडाऊन येथून मोदी बोगदा, मसिहा चौक, पत्रकार भवन चौक, महावीर चौक, आसरा चौक, विमानतळ ते एफसीआय गोडाऊन, होटगी रोड, कारखाना या मार्गाने येण्या-जाण्यास परवानगी राहील. सदर वाहनांसाठी पोलीस आयुक्तांची अथवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. या वाहनांचा वेग ताशी 20 किलोमीटर पेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
आरटीओ कार्यालयात पासिंग व नूतनीकरणा करिता येणारी जड वाहने ही केगाव बायपास मार्गाने जुना विजापूर नाका, विजापूर रोड या मार्गाने येण्यास जाण्यास तसेच अक्कलकोट रोड येथून येणारी जडवाहने ही कुंभारी मार्गे श्री सिद्धेश्वर साखर कारखाना, होटगी नाका, आसरा चौक, जुळे सोलापूर या मार्गाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे येण्यास परवानगी राहील. अत्यावश्यक कारणासाठी जड वाहतूक करणाऱ्या वाहनास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना राहणार आहेत. हे आदेश तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले असून आदेशाच्या अनुषंगाने कोणाच्या हरकती, आक्षेप असल्यास पंधरा दिवसात लेखी पोलीस आयुक्त कार्यालयात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या हरकतींचा विचार करून अंतिम आदेश देण्यात येतील असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.