सोलापूर: सोलापूरच्या (solapur) सुपुत्राला नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले आहे. छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (barshi) तालुक्याचे जवान रामेश्वर वैजिनाथ काकडे हे शहीद झाले आहेत. बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील शेतकरी कुटुंबातील रामेश्वर काकडे उमदे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई- वडील, बहीण, पत्नी आणि केवळ दोन महिन्याचे बाळ असा परिवार आहे.
रामेश्वर हे आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून, कष्टाच्या जोरावर आर्मीत भरती झाले होते. शहीद जवान रामेश्वर काकडे हे २०१२ साली जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी देशांतील वेगवेगळ्या राज्यात बॉर्डरवर आपली सेवा बजावली होती. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले. हा शेतकरी सुपुत्र आज भारतमातेच्या चरणी शहीद झाला. सोलापूर जिल्हा व बार्शी तालुक्यातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन महिन्यांच्या बाळाला पोरकेपणा आल्याने अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत.
दरम्यान, याबाबतची माहिती बुधवारी रात्री उशिरा काकडे कुटुंबीयांना सैन्य दलामार्फत देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शहीद जवान रामेश्वर काकडे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.