सोलापूर,दि.२५: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेने (ठाकरे गट) बुधवारी (दि.२३) ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून श्री सिध्देश्वर परिवाराचे धर्मराज काडादी आणि माजी आमदार दिलीप माने इच्छुक आहेत.
माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला होता. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप सोपल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे.
श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सिध्देश्वर परिवाराच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. त्यांना या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आणि कारखान्याच्या सभासदांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती. काडादी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काडादी यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
तर माजी आमदार दिलीप माने हेही या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे तिकीट न मिळाल्यास त्यांना येथून अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्याने महाविकास आघाडीत तेढ निर्माण झाला आहे.
काँग्रेस पक्ष अजूनही ही जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. माने यांच्या कार्यकर्त्यांनी तर ही जागा पुन्हा काँग्रेसला देण्यात आली आहे, असे सांगत जल्लोष केला आहे. माने यांच्या निवासस्थाना बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. मात्र अजूनही ही जागा अधिकृतपणे काँग्रेसला जाहीर झालेली नाही. मात्र या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार असे संकेत मिळत आहेत. मैत्रीपूर्ण लढत झाल्यास धर्मराज काडादी हे राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. तर दिलीप माने काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. अमर पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवू शकतात.