सोलापूर,दि.२६: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे गट) अमर पाटील (Amar Patil) यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी (ता. २५) होटगी रस्त्यावरील ‘सुमित्रा’ या माने यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत माने यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. (Solapur South Assembly Constituency Controversy)
सोलापूर शहर दक्षिणची जागा शिवसेना (ठाकरे गट) गटाला गेल्यानंतर माने यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांची बैठक येथे झाली. याप्रसंगी सोलापूर तसेच दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील आलेल्या माने समर्थकांनी प्रसंगी बंडखोरीचा झेंडा फडवून अपक्ष लढण्याबद्दल एल्गार पुकारला याच दरम्यान उपस्थित समर्थकांना माने यांनी उपरोक्त शब्दात मार्गदर्शन करत आव्हान दिलं.
काय म्हणाले दिलीप माने?
सोलापूर दक्षिणमधून ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत माने यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान या सर्व प्रकारावर दिलीप माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा माझा अपमान नसून माझे नेते सुशलिकुमार शिंदेचा अपमान असल्याचे माने म्हणाले. त्यामुळं आम्ही फॉर्म भरणार, केवळ दक्षिण सोलापुरातच नाही तर आणखी कुठंकुठं भरतो ते पाहा अशा इशारा माने यांनी दिली आहे.
काय म्हणाले अमर पाटील?
ही निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. ही विधानसभेची निवडणूक आहे. एखाद्याला ए.बी. फॉर्म दिला तो परत घेतला असे कधी झाले नाही. उद्धव साहेबांनी एकदा शब्द दिला की ते कधी फिरवत नाहीत. ही जागा ठाकरे गटाकडेच राहणार दुसऱ्यांना दिली जाणार नाही, असे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी सांगितले.
दक्षिणची जागा शिवसेनेकडेच राहणार
दक्षिणची जागा काँग्रेसला सुटली हे कोणी सांगितले ? प्रणिती शिंदे या आघाडीच्या चर्चेत नाहीत. त्यामुळे त्यांना हा सांगण्याचा अधिकार नाही. आमचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई आहेत. त्यांनी अजून सांगितले नाही. राऊत यांनी काही जागांवर बदल होईल असे सांगितले असले तरी त्यांनी दक्षिणचे नाव घेतले नाही. शरद पवार, नाना पटोले आणि संजय राऊत सांगत नाहीत मग शिंदे सांगणारे कोण असे सांगत सोलापूरचे निरीक्षक अनिल कोकीळ यांनी ही जागा ठाकरे गटाकडेच राहिल असे सांगितले.
माने यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
माने यांच्या उमेदवारीचा दावा असलेल्या दक्षिण विधानसभेची जागा उध्दव ठाकरे शिवसेना गटाला सुटल्यानं आक्रमक झालेले माने समर्थक त्यांची निवासस्थानी जमले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे या ठिकाणी आले. खासदार प्रणिती शिंदे यांचा निरोप त्यांनी सांगितला. ‘सोलापूर दक्षिणची जागा काँग्रेसकडेच राहणार असून दिलीप माने यांच्यासाठी एबी फॉर्म मी घेतला आहे’ असा प्रणिती शिर्देचा निरोप नरोटे यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. दिलीप मानेंसह उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
दिलीप माने यांना येथून दिली जाऊ शकते उमेदवारी
शिवसेना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांना सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. माने यांनी यापूर्वी 2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.








