सोलापूर,दि.14: सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा रविवारी दुपारी लाखो लोकांच्या उपस्थित पार पडला. यात्रेची 900 वर्षांची परंपरा आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेत सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो. सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडला.
तत्पूर्वी आज सकाळी नऊ वाजता यात्रेतील प्रमुख मानकरी हिरेहब्बू वाड्यापासून ढोल, ताशाच्या गजरात नंदीध्वजाच्या मिरवणुका निघाल्या. नंदीध्वज व पालखीतील ग्रामदैवत श्री च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दुतर्फ रस्त्यावर उभे होते.
ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी 2 वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. अक्षता सोहळ्याला यंदाही लाखों भक्तांची उपस्थिती होती.
‘शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय’ या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन् चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सातही नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाले. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता. सात नंदीध्वज विविधरंगी फुलांनी सजवल्या होते. मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सातही नंदीध्वज आले. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.
सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या.
अक्षता सोहळ्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, विश्वस्त ॲड. मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदि उपस्थित होते. या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते.