सोलापूर, दि.15: हत्तुरे नगर येथील मल्लिकार्जुन प्रशाला व सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेच्या 2 हजार विद्यार्थ्यांनी 1 हजार शिक्षक, पालक व रहिवासी यांच्यासमवेत सुमारे 3 किलोमीटरची प्रतिकात्मक नंदीध्वज मिरवणूक काढली. यावेळी यात्रेसारखीच वातावरण निर्मिती झाल्याने हत्तुरेवासियांनी यात्रेपूर्वीच अनुभवली यात्रा असे चित्र निर्माण झाले होते.
हेही वाचा Abdul Sattar: शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ
प्रतिकात्मक नंदीध्वज मिरवणुक काढण्याचे आवाहन
लोकमत आणि वीरशैव व्हिजन या सामाजिक संस्थेने शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास असणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचे मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यासाठी प्रतिकात्मक नंदीध्वज मिरवणुक काढण्याचे आवाहन केले होते. त्यास हत्तुरे नगर येथील मल्लिकार्जुन प्रशाला व सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मल्लिकार्जुन प्रशालेच्या प्रांगणात या मिरवणुकीचा प्रारंभ
यात्रेचे मानकरी जगदीश हिरेहब्बू, पत्रकार रेवणसिद्ध जवळेकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, प्राचार्य वैजनाथ हत्तुरे, धरेप्पा हत्तुरे यांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन प्रशालेच्या प्रांगणात या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. तेथून निघालेली मिरवणूक संपूर्ण हत्तुरे नगराची परिक्रमा करत पुन्हा मल्लिकार्जुन प्रशाला येथे विसर्जित करण्यात आली.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित हत्तुरे नगरवासीयांनी पालखीतील श्री सिद्धरामेश्वरांचे मनोमन दर्शनही घेतले. काहींनी पालखी वाहकांच्या पायावर पाणी अर्पण केले. काहींनी आरती करून पूजा केली. थंडीचे दिवस असतानाही सकाळी 9 वाजता चिमुकले बाराबंदीच्या पोशाखात नटून थटून आले. सोबत शिक्षकवृंद, पालक आणि हत्तुरे नगरवासीयांनीही आवर्जुन सहभाग नोंदवला.
यावेळी निघालेल्या प्रतिकात्मक नंदीध्वज मिरवणुकीत बाराबंदीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांच्या हातात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेप्रमाणेच 7 प्रतिकात्मक नंदीध्वज होते. तर मिरवणुकीच्या अग्रभागी ढोल पथक, भगवे झेंडेधारी पथक, कावड, पालखी, शेकडो बालचमू बाराबंदीच्या वेषभूषेत शिस्तीत होते. संबळ वादनाने मिरवणुकीचे वातावरण अत्यंत मंगलमय बनले होते. प्रशाला व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी पारंपारिक साडीमध्ये दागदागिने घालून नटून-थटून आल्या होत्या.
यावेळी मार्गावरील शेकडो भक्तगण मिरवणुकीचे फोटो व चित्रण आपल्या मोबाईल मध्ये करत होते. नंदीध्वज मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीच्या दरम्यान हत्तुरे परिवाराने मिरवणुकीवर गुलाबपुष्पांची पुष्पवृष्टी केली.
मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सचिन जाधव, मुख्याध्यापिका संगीता हुमनाबादकर, गिरमल्ला बिराजदार, सुकेशनी गंगोंडा, अनिल गावडे, अनिता हौदे,हेमलता पाटोळे, अनिल गावडे, मारुती माने, बसवेश्वर कोरे बसवराज बुरकुल, युवराज बिराजदार, काशिनाथ मळेवाडी, राजू फुलारी यांनी परिश्रम घेतले.