Solapur: सोलापूर शहरात कलम ३७ (१) व ३७ (३) आदेश लागू

0

सोलापूर,दि.१२: सोलापूर शहर (Solapur) हे महाराष्ट्रातील सर्वात मोठया प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. सोलापूर शहरात छोटया मोठ्या कारणावरुन सभा, संप, आंदोलने, निदर्शने इ. होत असतात. सोलापूर शहरात आगामी काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आहे. तसेच कोवीड- १९, ओमायक्रॉन या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रश्न, ओ.बी.सी. आरक्षण प्रश्न येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोर्चे निदर्शने, विरोध दर्शक आंदोलने इ. च्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक असल्याने बापू बांगर, पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे / विशा ), सोलापूर शहर, यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील ३७ (३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक १३/०२/२०२२ रोजीचे ००: ०१ वाजले पासुन ते दिनांक २७/०२/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश दिला आहे.

हा आदेश लग्न, अंत्ययात्रा इ. लागू असणार नाही. तसेच मिरवणूका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे, सभा इ. ना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन केला असेल, त्यांना लागू होणार नाही.

हा आदेश दिनांक १३/०२/२०२२ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २७/०२/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलात राहील. सदर आदेशामुळे कोविड -१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास बाधा येणार नाही.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील ३७ (१) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक १३/०२/२०२२ रोजीचे ००: ०१ वाजले पासुन ते दिनांक २७/०२/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे सोलापूर शहर पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here