Home सोलापूर वार्ता वाचनसंस्कृती वाढविण्याचा उद्देश अपूर्ण; शिक्षण आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशाची सोलापुरात अंमलबजावणी शून्य

वाचनसंस्कृती वाढविण्याचा उद्देश अपूर्ण; शिक्षण आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशाची सोलापुरात अंमलबजावणी शून्य

0

सोलापूर,दि.८: विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षण आयुक्तालयाने घेतलेल्या निर्णयाची सोलापूर जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांना निवेदन दिले. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

शिक्षण आयुक्तालयाने ३ जानेवारी २०२३ रोजी म्हणजेच सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातील किंवा परिसरातील मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद (वर्गणीदार) करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, या उपक्रमासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते.

मात्र, वर्ष २०२६ उजाडले तरी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा मूळ उद्देश अपूर्ण राहिल्याची खंत सदाशिव बेडगे यांनी व्यक्त केली. हा प्रलंबित निर्णय तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचे सदस्यत्व मिळवून द्यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.

निवेदन देतेवेळी सदाशिव बेडगे यांच्यासह सिद्राम मुद्देबिहाळ, धोंडिराम जेवूरकर, नरसिंह मिसालोलू, सिद्धाराम बगले, वजीर शेख, रामचंद्र वग्गे आणि ओमानंद बिराजदार आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.