सोलापूर,दि.15: प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने सोलापुरात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. सोलापुरात लोकसभा निवडणुकीत मदतानाच्या दोन दिवस अगोदर दंगल घडवण्याचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानंतर सोलापुरात दंगल घडवून लोकांमध्ये विभागणी करत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार होते, असा आरोप प्रणिती यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपाकडून आमदार राम सातपुते हे उमेदवार होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, ही लोकं रक्ताने राजकारण करतात असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. भाजपचे राज्यातील बडे लोक हे गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन भांडण आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करणार होते. भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल घडवा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, म्हणजे कळेल असा आरोपही खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय.
एकच फाईट, कॉलर टाईट
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, जे मतदारसंघात फिरले नाहीत त्या भाजपच्या आमदाराचे ही आभार मानते. 14 खासदार हे आता काँग्रेसचे आहेत, येणारा काळ हा देखील काँग्रेसचा आहे. आता एकच फाईट, कॉलर टाईट. केवळ माझी नाही तुमची ही कॉलर टाईट. इथून पुढे आता कामं घेऊन या, माझ्याकडे यायला कोणीही रोखणार नाही, पुढाऱ्यांचा आदर करते, पण तुम्ही देखील थेट कामं घेऊन या. मी कामं केलं नाही तर, कान पकडून मला खाली बसवा, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.