सोलापूर,दि.11: Solapur News: सोलापूरकरांचे 1000 कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज आहे. आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसे गुंतवले होते. दामदुप्पट डॉलर योजनांना बळी पडून हजारो सोलापूरकरांनी ‘सीसीएच’ (क्लाऊड मायनर ॲप) या अमेरिकन ॲपमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक केली असून, चार दिवसांपासून सीसीएच ॲपवर आणि मॅक्स क्रिप्टो यांचे डॉलर विथड्रॉल दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाल्याने सुमारे एक हजार कोटी रुपये डुबल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गुंतवणूक केलेल्या हजारो सोलापूरकरांना यामुळे शॉक बसला आहे. विशेष म्हणजे, यात वकील, आहेत. पोलीस, डॉक्टर, टेक्स्टाईल कारखानदार, सराफ व्यावसायिक, शिक्षक तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी ‘व्हर्च्यूअल मनी’मध्ये प्रचंड पैसा लावला आहे. सीसीएच, मॅक्स क्रिप्टो इतर ॲपमध्येही बहुसंख्य श्रीमंतांनी आयुष्यभराच्या कमाईची गुंतवणूक केली आहे.
दोन दिवसांपासून फेसबुक तसेच व्हॉट्सॲपच्या स्टेट्सवर लाखो रुपये बुडाल्याचे दुःख अनेकांनी मांडले. सोमवारी दिवसभर एकमेकांना फोनाफोनी करून कोणाचे किती बुडाले याची माहिती घेताना अनेकजण दिसले. विशेष म्हणजे, कर्ज काढून पैसे गुंतवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ज्यांनी सुरुवातीला यात पैसा लावला त्यांनी कोट्यवधी कमवले, सीसीएच कंपनीत 2 लाख 30 हजार रुपये गुंतवल्यास सात दिवसांत 44 लाख रुपये मिळवा, अशी योजना जाहीर झाली. योजनेला लाखो सोलापूरकर बळी पडले.
चिप्पा मार्केटजवळील किरण, चौपाड जवळील मूर्तिकार मोठे एजन्ट
अनेकांनी दिलेल्या माहितीनूसार पूर्वभागातील चिप्पा मार्केट जवळील किरण नामक मोठा एजन्टने मॅक्स क्रिष्टो नामक ॲपद्वारे शेकडो लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. दीडशे दिवसात तीनपटचे आमिष दाखवले. मागील दहा दिवसापासून मॅक्स किष्टो मध्येही विथड्रॉल होईना. अशाच प्रकारे चौपाड येथील सराफ व्यावसायिक असलेल्या एकाने शेकडो लोकांकडून पैसे गुंतवणूक करून घेतले. स्वतःच्या रिस्कवर पैसे गुंतवा अन नफा मिळवा, असे त्यांच्याकडून स्पष्ट सांगितले गेले. अनेकांचे पैसे बुडाल्याने त्यांच्याकडे येवून तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
1000 कोटी रुपये बुडाले
डायरेक्ट सेलिंगबद्दल लोकांना ज्ञान नाही. तांत्रिक माि नसताना व्हर्चुअल गुंतवणूक करतात, हे चुकीचे आहे. एकाच्या नावाने पंधरा-वीस कंपन्यांची नोंदणी असते. या कंपन्या फेक असतात. 2019 गाइडलाइननुसार भारतात डायरेक्ट सेलिंगमध्ये व्हच्युअल करन्सीवर पूर्णपणे बंदी आहे. डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणी डायरेक्ट सेलिंग कायदादेखील आला आहे. व्हर्च्यूअल करन्सीमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांशी चर्चा करा. माहिती घ्या. अभ्यास करा. त्यानंतर गुंतवणूक करा, अन्यथा तुमची शंभर टक्के फसवणूक होणारच.
सिद्धेश्वर कदम,
तज्ज्ञ-नेटवर्क मार्केटिक, (डायरेक्ट सेलिंग कंपन्या
अशी होती स्कीम
सीसीएच स्कीम डेली रिटर्नवर जास्त चालते. ॲपवर अनेक योजना आहेत. सभासद होताना सुरुवातीला 1090 यूएसडीटी डॉलरची गुंतवणूक केली जाते. 1090 डॉलर म्हणजे 92 हजार 650 रुपयांची व्हरच्युल गुंतवणूक केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सभासदांना 7 हजार 412 रुपये असे 35 दिवस मिळतात. म्हणजे 35 दिवसांत दोन लाख 59 हजार 419 रुपये ॲपच्या खात्यावर डॉलर स्वरूपात जमा होतात. दुसऱ्या योजनेंतर्गत 1624 यूएसडीटी डॉलर म्हणजे 1 लाख 38 हजार 40 रुपये गुंतविल्यानंतर 102 दिवसांत 26 लाख 48 हजार 820 रुपये मिळतात. म्हणजे प्रतिदिन 15 हजार 322 रुपये मिळतात. अशा अनेक योजना ॲपवर आहेत. योजनेनुसार सुरुवातीला अनेक दिवस पैसे जमा होत राहिले. एकाकी पैसे गुंतवणाऱ्यांचे प्रमाण शंभरपटीने वाढले. त्यानंतर अचानकपणे विथड्रॉल बंद झाला. त्यामुळे नव्याने योजनेत सहभागी झालेल्यांचा पैसा बुडाला तर जुन्या सभासदांना लावलेला पैसा त्यांना मिळाल्याने ते सेफ झोन मध्ये आहेत.