सोलापूर,दि.२: Solapur: सोलापुरात संभाजी भिडे समर्थकांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला.
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ सोलापुरात आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह वर्तन केल्याने आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करून जेरबंद केले.
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर शिवप्रतिष्ठान आणि भाजप कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती .या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. कार्यकर्त्यांची घरपकड सुरू आहे.
भिडे गुरूजींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले, राजा राममोहन राॕय, पं. जवाहरलाल नेहरू,रामास्वामी पेरियार व अन्य महापुरूषांवर गरळ ओकणारी वक्तव्ये केली आहेत. तसेच भारतीय तिरंगा ध्वजाचाही अवमान केला आहे. त्यामुळे भिडे गुरूजींच्या विरोधात राज्यभर आंदोलने होत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी करताना सत्ताधारी भाजप त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ आंदोलन हाती घेतले आहे.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनासाठी आलेल्या सुमारे १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी, काही आंदोलकांनी जुना पुणे चौत्रा नाक्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ भिडे गुरूजींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा तेथे भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांना शेवटी बळाचा वापर करून गर्दीला हुसकावून लावले. याचवेळी भाजप व बजरंग दलाचे पदाधिकारी राजकुमार पाटील यांनी वाद घातल्याने त्यांनाही पोलिसांचा ‘ प्रसाद ‘ मिळाला.