सोलापूर,दि.17: काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील हे जवळपास ठरलेले आहे. भाजपाकडून अनेकांची नावे चर्चेत होती. अमर साबळे, लक्ष्मण ढोबळे व शरद बनसोडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता माळशिरसचे भाजपा आमदार राम सातपुते यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त आहे. आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आक्रमक व लोकप्रिय चेहरा आहेत.
प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्यच्या आमदार आहेत. सोलापूरचे अनेक प्रश्न प्रणिती शिंदे विधान सभेत मांडत असतात. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे त्या महिलात लोकप्रिय आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे आमदार राम सातपुते यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरचे आमदार आहेत. सातपुते यांनीही जिल्ह्यातील प्रश्न विधान सभेत मांडले आहेत. सातपुते त्यांच्या मतदार संघातील गावा गावात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. आमदार प्रणिती शिंदे यांनी तर लोकसभेच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.