सोलापूर,दि.3: Solapur Lok Sabha: लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर होणार आहे. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या भाजपाच्या खासदारांनी मतदारसंघात काहीही विधायक कामे केली नाहीत. भाजपाचे खासदार पूर्णपणे निष्क्रिय ठरले. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे अनेकजण सत्ताधारी भाजपावर नाराज होते. मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम ही या निवडणुकीत दिसून आला. मराठा समाज सत्ताधारी पक्षावर नाराज होता.
Solapur Lok Sabha | वार फिरलय कारण मतदारांचे ठरलय
वार फिरलय कारण मतदारांचे ठरलय याची प्रचिती उद्याच्या मतमोजणीनंतर येणार आहे. नाराज असलेला शेतकरी, लिंगायत समाजाची विभाजित झालेली मते, मराठा समाजाची नाराजी, मुस्लिम समाजाचे एकगठ्ठा मतदान, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याचा परिणाम तसेच MIM चाही उमेदवार या निवडणुकीत नव्हता. यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
प्रणिती शिंदे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात घेतलेली आघाडी, तसेच स्थानिक मुद्द्यावर घेतलेली भूमिका यामुळे प्रणिती शिंदे यांच्या बाजूनेच मतदार असल्याचे दिसून आले. याउलट भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होण्यास लागलेला विलंब तसेच भाजपने निवडणुकीत धार्मिक रंग देण्याचा केलेला प्रयत्न यामुळे भाजपा पासून अल्पसंख्याक मतेही दूर गेली. सोलापुरातील बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न, बंद असलेली सिटी बस सेवा हेही मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले.
दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेमध्ये मिलिटरी कापड घेण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण केले नाही. त्याची पूर्तता कधी करणार असा सवाल उपस्थित करत चंदेले यांनी काँग्रेसच्या साठ वर्षांतील सत्ता कार्यकाळातील विविध विकासकामांवर प्रकाश टाकला होता. सोलापुरात भाजपने एकाही आश्वासनांची न केलेली पूर्तता यामुळे प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित आहे.