सोलापूर,दि.27 : दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी न करता स्वतःच्या शहरातच व्यवसायच करायचा असा निश्चय केलेल्या मेकॅनिकल इंजिनियर केतन अंबुलगे याने नुकतेच स्वतःचे केतन ऑटो इंडस्ट्रीज हे वर्कशॉप सुरू करून आपला निश्चय पूर्ण केला.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण घेतलेल्या केतन अंबुलगे हा पुणे येथे एका कंपनीत नोकरीस लागला. चांगल्या पगाराची नोकरी असूनही त्यांचे मन नोकरीत रमले नाही. ती नोकरी सोडून तो सोलापुरात आला.
त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. आपण कोणता तरी स्वतःचा व्यवसायच सुरू करायचा असा चंग त्याने मनाशी बांधला. तेव्हा त्याला एक मार्ग दिसला. तुळजापूर रोड वरील शिवानंद गंगावती यांच्या साई इंजिनिअरिंग येथे मालवाहतूक वाहनांचे बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो जाऊ लागला.
आवडीचेच काम मिळाल्याने केतनची रुची यात वाढत गेली. 3 वर्षाचे खडतर प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
केतनचे वडील सिद्धेश्वर प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत तर आई सुनीता शिक्षिका आहे. भाऊ नागेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत विभागीय व्यवस्थापक तर वहिनी निशा संगणक अभियंता आहे. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही घरातून 1 रुपया देखील घ्यायचा नाही असा निश्चय केतनने केला होता. जे काही करायचे ते स्वतःच्या हिमतीवर करून दाखवायचे असे त्याने ठरवले होते.
त्याने पंजाब नॅशनल बँकेत संपर्क साधला. बँकेतूनही त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. व्यवस्थापकांनी लागलीच केतनला 12 लाखांचे कर्ज मंजूर केले. आर्थिक तरतूद तर झाली आता जागा हवी. यासाठी त्याने जागेचा शोध सुरू केला. हैदराबाद रस्त्यावर पोलीस हवालदार हविल जाधव यांची जागा त्याला भाड्याने उपलब्ध झाली. तेथेच आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करायचे त्याने ठरविले.
कर्जाच्या रकमेतून केतन ऑटो इंडस्ट्रीज या नावाने वर्कशॉप उभे केले. पुण्याहून यंत्रसामग्रीही आणली. आता गरज होती ती कामांची. काम मिळवण्यासाठी तो मालवाहतूक वाहनांच्या वितरकांशी संपर्क साधू लागला.
अक्कलकोट रस्त्यावरील टाटा वाहनांचे वितरक चव्हाण मोटर्सने केतन हा या व्यवसायात नवखा असला तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाचे कंटेनर बनविण्याचे एक काम दिले. केतनने हे काम आपले कलाकौशल्य वापरून कामाचा दर्जा उत्तम प्रतीचा राखून ठरलेल्या वेळेत पूर्ण करून दिले. त्याचे काम पाहून चव्हाण यांनी यापुढेही काम देण्याचे आश्वासन केतनला दिले आहे.
केतनच्या धाडसाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. युवकांनी देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा सूर देखील ऐकण्यास मिळत आहे.