Solapur Flood: सोलापूर विजयपूर महामार्ग बंद, तिऱ्हेला पाण्याचा वेढा

0

सोलापूर,दि.३०: Solapur Flood News: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा आणि पुराचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. सीना नदीची पातळी पुन्हा वाढली असून तिहे-पाकणी आदी गावांना पाण्याने वेढा घातला आहे. सीना कोळेगाव धरणातून सध्या १ लाख ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर ते विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने भीमा नदीसही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

Solapur Flood News

अहिल्यानगरमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सीनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नदीला पुन्हा एकदा पूर आला. या पुरामुळे सोलापूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

जामखेड मार्गावरील आळजापूर येथील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे पुलाजवळील डांबरीकरण केलेला रस्ता वाहून गेल्याने करमाळा-जामखेडचा संपर्क तुटला आहे.

सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील हत्तूर गावाजवळ पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहतूक बसवनगर-कामती-कुरुल मोहोळ या मार्गाने वळविण्यात आली आहे. 

सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. 

वडकबाळ येथे जिल्हाधिकारी, सीईओंची भेट

वडकबाळ येथील पूरग्रस्त भागाची सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पाहणी करून येथील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व प्रशासनाकडून लोकांना आवश्यक ती मदत करण्याची सूचना दिली. यावेळी तहसीलदार सुजित नरहरे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here