सोलापूर,दि.१२: शहरात ई-बस सेवा सुरू होण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मरीआई चौकातील महानगरपालिका एक्झिबिशन हॉल येथे ‘तारीख पे तारीख’ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. परिवहन सेवा तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध आंदोलने आणि निवेदने देऊनही सेवा सुरू झालेली नाही.
महानगरपालिकेच्या वतीने परिवहन सेवा सुरू करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या; मात्र त्या तारखा उलटूनही प्रत्यक्ष सेवा सुरू झाली नाही. १५ ऑगस्ट रोजी २० ई-बसेसचे उद्घाटन होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी बसेस रस्त्यावर धावलेल्या नाहीत. ई-बसेस उपलब्ध असूनही चार्जिंग स्टेशन, आवश्यक वीजव्यवस्था आणि बस थांब्यांची कामे अपूर्ण असल्याने सेवेला विलंब होत आहे. उद्घाटनापूर्वी सर्व आवश्यक सुविधा पूर्ण का करण्यात आल्या नाहीत? असा जाब संभाजी ब्रिगेडने महानगरपालिका प्रशासनाला विचारला आहे.
शहरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत आवश्यक आहे. २०१३ मध्येही बससेवेसाठी मोठा निधी खर्च करून बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती टाळून नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय रोखावा, अशी मागणी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी सोलापुरात सुरू झालेली विमानसेवाही अवघ्या काही दिवसांत बंद पडली. त्यामुळे प्रकल्प केवळ घोषणा आणि उद्घाटनांपुरते मर्यादित न ठेवता शहरांतर्गत परिवहन सेवा नियमित सुरू ठेवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, संभाजी राजे भोसले, वैभव गायकवाड, गुंडप्पा जाधव, प्रकाश डोंगरे, शेखर भोसले, प्रकाश व्यवहारे, संतोष सुरवसे, राजेंद्र माने, सचिन यादव, अक्षय कांबळे, दिलीप निंबाळकर, प्रसाद देवरमनी, सिध्दाराम गुरव, महेश हिपळे, आदित्य हत्तुरे, सनी पाटू, बसवराज पाथरट, विनोद सुतार आणि सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








