सोलापूर,दि.१८: महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ७५८ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्याचे आदेश यापूर्वीच निवडणूक आयोगाने दिले आहेत. आत्ता या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी २० फेब्रुवारी पासून प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही ग्राम विकास खात्याने मगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास खात्याकडून दिलेल्या सूचनेनुसार २० फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना गुगल अर्थने प्रत्येक गावाचे नकाशे तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळपाहणी करुन प्रभाग पाडून त्याची सीमा निश्चित करावे असे या आदेशात म्हटले आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून ५ मार्च पर्यंत प्रारूप प्रभागरचनेची तपासणी करण्यात येणार आहे. या समितीत गटविकास अधिकारी व संबंधित मंडल अधिकारी यांचाही समावेश असणार आहे.
तहसीलदार यांच्या समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल प्रांताधिकारी यांच्या मान्यतेने ११ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. १७मार्च पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारुप प्रभाग रचनेवर दुरुस्ती किंवा आवश्यक अभिप्राय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.
२३ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रारुप प्रस्तावावर निवडणुक आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर ३० मार्च रोजी तहसीलदार यांच्या समितीकडून दुरुस्तीसह नव्या प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून ७ एप्रिल पर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल पर्यंत प प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर दाखल झालेल्या हरकतीवर प्रांताधिकारी यांच्या स्तरावर २१ एप्रिल पर्यंत सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
२३ एप्रिल पर्यंत प्रांताधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. प्रातांधिकारी यांच्याकडून दाखल करण्यात आलेला प्रारुप प्रभाग आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडून २८ एप्रिल पर्यंत राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिध्द करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मुदत संपत असलेल्या एकूण ७५८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक राज्य शासनाच्या आदेशानुसार करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती तुर्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत ही २०२४ मध्ये संपली आहे. त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. तर ६५८ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत ही फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे.








