सोलापूर,दि.30: सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील लोकांनी 3 डिसेंबरला बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला आहे. मतमोजणी नंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे 132 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे (शिंदे गट) 57 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. शिवसेना (ठाकरे गट) 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 जागा मिळाल्या आहेत.
निवडणूक निकालावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात अविश्वसनीय निकाल पाहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे राम सातपुते हे उमेदवार होते.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा निकाल जरी उत्तम जानकर यांच्याबाजूने लागला असला तरी मारकवाडी गावातील लोकांनी ईव्हीएम मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. गावातील मतदारांचे म्हणणे आहे की आमच्या गावातून राम सातपुते यांना लिड मिळाल्याचे निकालातून दिसून येत आहे. तर उत्तम जानकर यांना सातपुते यांच्यापेक्षा कमी मतं मिळालेली दिसत आहेत.
मारकवाडी गावातील लोकांचे म्हणणे आहे की आमच्या गावातून राम सातपुते यांना मताधिक्य मिळणे शक्य नाही. गावातील लोकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच गावातील लोकांचे पुन्हा मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) मतदान घेण्याची मागणी केली आहे. गावातील लोकांनी मतपत्रिकाही छापून आणल्या आहेत.
गावकऱ्यांनी स्वखर्चाने ही मतदान प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला आहे. 3 डिसेंबरला हे मतदान होणार आहे. 20 डिसेंबरला ज्याला मतदान केले त्यालाच बॅलेट पेपवर करावे असे आवाहन गावातील नागरिकांनी केले आहे. जेणेकरून मतमोजणी केल्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मते व बॅलेट पेपरवरील मतातील फरक लक्षात येईल.