Solapur Curfew: सोलापूर शहरातील या भागात संचारबंदी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी जारी केले आदेश

0

सोलापूर, दि.११: कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा कालावधीत १२ ते १६ जानेवारी दरम्यान श्री सिध्देश्वर मंदिर परिसरात संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिला आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सुरू झाली असून, या कालावधीमध्ये विविध राज्यांतून भाविक सोलापुरात दर्शनासाठी येत असतात; पण सध्याला कोरोनाच्या नव्या प्रतिरूपामुळे विविध निर्बंध घालण्यात आले आहे. यामुळे बुधवार, दि. १२ जानेवारी रात्री बारा वाजल्यापासून ते रविवार दि. १६ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी जारी केले आहेत.

हा मार्ग बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( पार्क चौक ), मंगळवेढेकर इस्टिट्यूट कॉर्नर, हरिभाई देवकरण प्रशाला समोरील रस्ता, स्ट्रिट रोड, सिध्देश्वर कन्या प्रशालासमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( पार्क चौक ) अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी आदेश लागू राहील. यामुळे हा मार्ग नागरिकांना रहदारीसाठी वापरता येणार नाही.

कोरोनामुळे यंदाही ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही निवडक मानकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. यात्रेसाठी फक्त पन्नास जणांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सर्व मानकऱ्यांना विशेष पास देण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसरातील रहिवाशांनाही विशेष पास देण्यात येणार आहेत. यासाठी राहिवाशांनी पुराव्यासह संबंधित पोलीस ठाण्याकडून पासेस प्राप्त करून घ्यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिवाय शासनाच्या वतीने संबंधित ठिकाणी सेवा बजाविणाऱ्यांनी स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवावे, तसेच या भागात अत्यावश्यक सेवा बजाविणारे व्यक्ती व शासकीय वाहनांना प्रवेशास परवानगी असणार आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पास काढून घेणे बंधनकारक असून, पास असलेल्या व्यक्तींनाच परिसरात प्रवेश दिला जाईल. पासधारक भाविकांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच येणे आवश्यक आहे.

या कालावधीमध्ये मंदिर परिसरात परवानगीव्यतिरिक्त इतरत्र नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक, वाद्यपथक आदीबाबींना मनाई असेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here