सोलापूर,दि.१७: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. १०२ पैकी भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला मोठा विजय मिळाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीचा(शरद पवार गट) एकही उमेदवार निवडून आला नाही. भाजपानंतर सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएम दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. एमआयएमचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत.
एमआयएमने आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले
भारतीय जनता पक्षाच्या लाटेत एमआयएमने आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेसारखे प्रस्थापित पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत भुईसपाट होत असताना एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून येत भाजप नंतरचा दोन नंबरचा पक्ष ठरला आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी आठ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील एमआयएम पक्षाचे मुख्य चेहरा असलेला नेता आणि शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी राजीनामा देऊन खळबळ उडून दिली होती.
मागील महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा जणांनी तोफिक हत्तुरे यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मतदारांनी व्यक्ती पेक्षा पक्षश्रेष्ठ मानून नवखे उमेदवार असतानाही पुन्हा एकदा एमआयएमच्या पारड्यात भरभरून मते दिल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट
एकूण १०२ जागांपैकी ८७ जागा मिळवून भाजपने सलग दुसऱ्यांदा महापालिकेवर सत्ता प्राप्त केली आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा धुव्वा उडाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीच्या झोळीत विजयाच्या पाच जागांचे दान पडले आहे. यामध्ये शिवसेना चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव जागेचा समावेश आहे.








