सोलापूर,दि.१७: सोलापूर महानगरपालिकेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) युती केली आहे. सोलापूर महानगरपालिकेत भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. १०२ जागांपैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून विनायक कोंड्याल हे महापौर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती केली असून महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी युतीच्या सत्तेची नोंद झाली आहे.
सभागृह नेते नरेंद्र काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव हत्तुरे यांनी सोमवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात जावुन भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. त्यामुळे महापालिकेतील सत्ता केवळ भाजपची नसून युतीची असल्याची नोंद झाली आहे.
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबतची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. १०२ सदस्य असलेल्या महापालिकेत भाजपचे ८७ सदस्य आहेत. वैभव हत्तुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत.
वैभव हत्तुरे हे पुर्वाश्रमीचे भाजपाचे नगरसेवक आहेत. गेल्या वेळी ते भाजपकडूनच निवडून आले होते. यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. कारण प्रभाग क्रमांक २५ माजी आमदार दिलीप माने यांच्या गटाला सोडण्यात आला होता. या गटाचे नागेश ताकमोगे यांना भाजपाने उमेदवारी दिली होती.
वैभव हत्तुरे यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी मिळवली आणि ते भाजपाचे नागेश ताकमोगे यांचा पराभव करुन निवडून आले. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बहुतेक प्रभागात भाजपचे उमेदवार विजयी झाले असताना फक्त प्रभाग २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव हत्तुरे निवडून आले.
सभागृहात विरोधी बाकावर १५ सदस्य होते. त्यापैकी वैभव हत्तुरे सत्ताधारी बाकावर गेल्यामुळे राजकीय गणिते बदलणार आहेत. याचा पहिला प्रत्यय येत्या २० फेब्रुवारीला स्वीकृत सदस्य निवडताना येईल. सदस्य संख्येचा विचार करता भाजपाचे आठ सदस्य निवडून येतात. नववा येण्यासाठी तांत्रिक अडचण येत होती. वैभव हत्तुरे यांच्यामुळे ती दूर झाली आहे.








