सोलापूर,दि.15: 16 डिसेंबर सोलापूर बंदबाबत (Solapur Band) शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (purushottam barde) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शुक्रवार, 16 डिसेंबर रोजी सोलापूर शहर बंदची (Solapur Band) हाक देण्यात आली असून हा बंद या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत पाळला जाणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष शेखर फंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Solapur Band | सकाळी नऊ वाजता रॅलीला सुरुवात होणार
शुक्रवारी सकाळी नऊ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात होईल. रॅलीद्वारे महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप होणार आहे. बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता मार्केट यार्ड, सराफ बाजार, भुसार व्यापारी यांचा सहभाग राहणार असून बंदच्या या वेळेची इतरही सर्वच व्यापाऱ्यांनी नोंद घेऊन 100 टक्के बंद यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस होती यांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे भाऊसाहेब रोडगे, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, उपाध्यक्ष शिवाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.
बंदचा राजकारणाशी संबंध नाही
या बंदचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याने हा बंद पुकारण्यात आला असून यापुढे कोणत्याही महापुरुषांबद्दल अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करण्याचे धाडस कोणीही करू नये, म्हणून हा बंद असल्याचे या पत्रकार परिषदेस उपस्थित नेत्यांनी सांगितले. तर तरुणांना मोठ्या संख्येने रॅलीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष शेखर फंड व मनपा परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव यांनी केले.