Solapur Bakrid: सोलापुरातील मुस्लीम बांधवांनी घेतला आक्षेप, ‘लव्ह पाकिस्तान लिहिलेले फुगे…’

0

सोलापूर,दि.३०: Solapur Bakrid: सोलापुरातील मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलमगीर ईदगाह मैदान परिसरात फुगे विक्री करणाऱ्या दोघांकडे असलेल्या फुग्यांवर ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात आल्यानंतर मुस्लीम बांधवांनी त्या दोघा विक्रेत्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे.

सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आक्षेप | Solapur Bakrid

बकरी ईद असल्याने गुरुवारी सकाळी होटगी रस्त्यावरील ईदगाह मैदान व परिसरात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने जमले होते. महिला हॉस्पिटलजवळ नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना भेटून शुभेच्छा देत असताना या परिसरात काही फुगे विक्रेते थांबल्याचे तेथील मुस्लीम युवकांनी पाहिले. या फुग्यांवर पाकिस्तानच्या झेंड्याचे चित्र, लव्ह पाकिस्तान व उर्दूमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा असे लिहिल्याचे आढळून आले. त्यामुळे तत्काळ काहीजणांनी आक्षेप घेतला. त्यांनी या दोघा फुगे विक्रेत्यांना तेथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी या दोघांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले. या विक्रेत्यांकडे पोलिसांनी अधिक चौकशी करुन ते फुगे कोठून आले याचा शोध लावून मधला मारुती येथील एका दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.

हा फुगा एखाद्या मुस्लीम समाजातील लहानग्याने हातात घेतला असता आणि त्याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असते तर मोठे वादंग निर्माण झाले असते.

दरम्यान, पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस नाईक गणेश शिर्के यांच्या फिर्यादीवरुन फुगे विक्रेते अजय अमन पवार (वय २०, रा. चैतन्य मार्केटमागे, विजापूर रस्ता), शिवाजी लक्ष्मण पवार व दुकानदार रोशन खिलौना हाऊसचे तन्वीर बागवान या तिघांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार सिध्देश्वर मुरकुटे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here