Home क्राइम प्राणघातक हल्ला प्रकरण: ८ जणांना जामीन मंजूर

प्राणघातक हल्ला प्रकरण: ८ जणांना जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.१३: दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बिन्ज्गेर (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील ८ आरोपींना सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गुडूसाब शेख, रेहान शेख, महमद शेख, महमद हुसेन शेख, शाकीर जमादार, गुलाब जमादार, महमद गनीसाब शेख आणि हसीना जमादार अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

घटनेची पार्श्वभूमी

मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ५ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणपती बंदिचोडे यांच्या बोकडाला गुलाम जमादार यांच्या कुत्र्याने चावा घेतला होता. यावर चर्चा करण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी एकत्र आली होती.

ही चर्चा सुरू असतानाच, हसीना जमादार हिने फिर्यादीच्या मुलाच्या कानशिलात लगावली. याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता, हसीना तिचा भाऊ गुडूसाब शेख याने धावून येत फिर्यादीच्या डोक्यावर आणि गळ्याजवळ धारदार चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या अन्य एका व्यक्तीच्या डोक्यावर व पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

या वेळी आरोपींसोबत आलेल्या महमद शेख, शाकीर जमादार, गुलाम जमादार आणि महमद गनीसाब शेख यांनी फिर्यादी व जखमी व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने गावातील लोक जमा झाले, त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले होते.

न्यायालयातील युक्तिवाद

या प्रकरणी सर्व आरोपींनी वकील अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

बचावपक्षाचा युक्तिवाद

“हा वाद केवळ मुख्य आरोपी आणि फिर्यादी यांच्यातच झाला असून, इतर आरोपींवर दबाव आणण्याच्या उद्देशाने या प्रकरणात सर्वांना गोवण्यात आले आहे.”

न्यायालयाने बचावपक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व ८ आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट अभिजीत इटकर, ॲड. फैयाज शेख आणि ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.