सोलापूर,दि.१८: राज्यात सध्या एका बाजूला उन्हाचा कडकडीत चटका आणि प्रचंड उकाडा (Heat) सहन करावा लागत असताना, दुसऱ्या बाजूला हवामानात लक्षणीय बदल (Climate Change) पाहायला मिळत आहे. मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्राचा बहुतांश भाग सोडला असला, तरी सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज (१८ ऑक्टोबर) कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोलापूरसह (Solapur) राज्यातील ११ जिल्ह्यांत वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे.
कोकण किनारपट्टी भागात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८, १९ आणि २० ऑक्टोबर दरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वादळी वारे (Strong Winds) वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे-कुठे असणार पावसाचा प्रभाव?
हवामान खात्याच्या अहवालानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील प्रमुख जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain) शक्यता आहे. याशिवाय, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पुणे, सातारा, रायगड, बीड आणि परभणी या जिल्ह्यांच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
हवामानातील या अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी वर्गामध्ये (Farmers) चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित भागांतील नागरिकांना हवामानाच्या या स्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








