Shri Swami Samarth: गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0

सोलापूर,दि.१९: Shri Swami Samarth: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन (Shri Swami Samarth Manifestation Day) गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी दिली.

प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम | Shri Swami Samarth

प्रारंभी प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी (दि.२२) साडेतीन मुहूर्तापैकी पहिले प्रमुख पूर्ण मुहूर्त असलेल्या हिंदू धर्म नूतन वर्ष प्रारंभ गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर समितीचे चेअरमन महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहीत मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस पहाटेच्या काकडआरती नंतर देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात येईल.

सकाळी १०:३० वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त सालाबादाप्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, पारायण, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पुजन होईल. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात येईल. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद (शिरा) वाटप करण्यात येईल.

तद्नंतर सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) अक्कलकोटच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन गुरुवार दिनांक २३/३/२३ रोजी साजरा होत आहे. यादिवशी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन श्रींच्या चरणी गुलाल पुष्प वाहून स्वामींचा जन्म सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल.

यानंतर स्वामी प्रकट दिनानिमित्त दुपारी ३ ते ५ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात अलिबाग येथील नुपूर नृत्यकला संस्थेच्या वतीने प्राजक्ता कोकणे व सहकाऱ्यांची भरत नाटयम / कथ्थक सेवेचा स्वामीरंग कार्यक्रम सादर होईल. तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा यासह गुरुवारीच स्वामींचा प्रकट दिन असल्याने मंदिरात जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीची शेजारती व दर गुरुवारी मंदिरातच संपन्न होणारा पालखी सोहळा प्रकट दिन दिवशीच्या गुरुवारी होणार नाही याची स्वामी भक्तांनी विशेष नोंद घ्यावी. असेही आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here