नाशिक,दि.21: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात ईव्हीएमशिवाय निवडणुका घेऊन दाखवा, असं संजय राऊत म्हणाले. भाजपा ईव्हीएममुळे निवडणुकीत विजयी होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेला अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे.
सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं
‘वन नेशन, वन इलेक्शन’ वरून संजय राऊत नाशिकमध्ये बोलताना म्हणाले, ‘ईव्हीएम आणि वन नेशन वन इलेक्शन भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं आहे. हे सर्व फ्रॉड आहे. देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्यादिवशी भाजपा ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही.’
ईव्हीएम हटी भाजपा गई
संजय राऊत यांनी भाजपाला एकतरी निवडणूक ईव्हीएमशिवाय घेऊन दाखवावी असे आव्हान दिले आहे. भाजपला स्वतःच्या क्षमतेवर एवढा आत्मविश्वास असेल. तर त्यांनी कोणत्यातरी एका निवडणुकीपुरतं ईव्हीएम दूर करावं. वाराणसीतल्या निवडणुका तरी त्यांनी ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवाव्यात. मग त्यांना कळेल मी काय म्हणतोय. ईव्हीएम हटी भाजपा गई…, हा नारा आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ईव्हीएम ही दुर्घटना आहे. वन नेशन वन इलेक्शन हा फ्रॉड देशाची लोकशाही संपवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.