आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटाचे काही खासदार…

0

मुंबई,दि.13: शिवसेना शिंदे गटातून (Shinde Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या (BJP) चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुललं होतं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या कमळालाच यश मिळेल असं चित्र आहे. त्यामुळे धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होईल असे शिंदे गटातल्या काही खासदारांना वाटत असल्याचे म्हटलं जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी शिंदे गटातील काही खासदारांची इच्छा आहे. तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी नावाचा आणि कमळ चिन्हाचा फायदा होऊ शकतो. यामुळेच कमळ चिन्हावर लढावे, अशी शिंदे गटाच्या काही खासदारांची इच्छा असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी सुरु झाल्या आहेत. तसेच तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील निकाल भाजपाच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळे कमळ चिन्हाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर मोदी आणि भाजपाच्या यंत्रणेचा फायदा अधिक होऊ शकतो असे शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही खासदारांच्या मनामध्ये चलबिचल सुरु आहे. पुढील काळात चित्र स्पष्ट होणार असलं तरी सध्या शिंदे गटातील अनेक खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणे फायद्याचे असू शकते असे वाटत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here