दि.8: “असली आ रहा है, नकली से सावधान” असे बॅनर शिवसेनेने अयोध्येत लावले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्याला जाणार आहेत. मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये विरोध होत आहे. राज ठाकरे यांच्या अगोदर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर चालले आहेत. आता शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत फडकविण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवसेना – मनसेमधील वाद हा थेट अयोध्येत पोहोचला आहे.
बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांची हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले.
आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राज यांच्या पूर्वी ते अयोध्येला धडकणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राज यांच्या माफीनाम्याचे मागणी केली जात असताना आता शिवसेनेने राज यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला असतानाच आता याच मागणीचे बॅनर अयोध्येत जागोजागी झळकले आहेत. राज हे 5 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. खा. ब्रिजभूषण सिंह यांनी राज यांना इशारा दिलेला होता, पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना फोन करून समजावले असून, आता ते शांत झाले आहेत, असा दावा मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दोन दिवसांपूर्वी केला.