मुंबई,दि.3: विधानभवनातलं शिवसेना विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आलं आहे. शिवसेना विधिमंडळ कार्यालयातील सर्व स्टाफ कार्यालयाबाहेर आहे. कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार होती.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. त्याआधीच विधिमंडळ कार्यालय सील केल्याची बातमी समोर आली आहे.
शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे हे कार्यालय सील केलं आहे का? कार्यालय सील कोणी केलं. याबाबत सवाल उपस्थित केले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून पक्ष कार्यालय बंद केल्याचे पत्र दिल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याची माहिती मिळतेय. कारण सुनील प्रभू यांनी शिवसेनेकडून असं पत्र दिले नसल्याचा खुलासा केलाय.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटात जुंपण्याची शक्यता आहे. बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार विधानसभेत आमने-सामने येणार आहेत. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. पण, प्रतोद सुनील प्रभूंचा व्हिप आम्हाला लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाने केलाय. त्यामुळे पक्षादेशावरून बंडखोर आणि शिवसेनेत संघर्षाची शक्यता आहे.