जळगाव,दि.१५: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (दि.१४) १४ ट्विट करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये बातम्यांची लिंकही दिली होती. जळगावात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अवघ्या दोन शब्दांत हसत हसत उत्तर दिलं. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी मला जातीयवादी का म्हटलं याची कल्पना नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींना पक्षात महत्त्वाची पदं देण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काल एकापाठोपाठ एक अशी १४ ट्विट्स केली. शरद पवारांनी अल्पसंख्यांकाचं लांगुलचालन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी संबंधित बातम्यांच्या लिंक्सदेखील शेअर केल्या. त्यावरून पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला. फडणवीसांनी काल १४ ट्विट करतो. त्यावर तुम्हाला काय वाटतं, असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावर टीका एन्जॉय करतो, असं मिश्किल उत्तर पवारांनी दिलं.
१९९३ बॉमस्फोट
१९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळी पवारांनी आकडा एकनं वाढवला आणि मुस्लिमबहुल भागात एक स्फोट झाल्याचा शोध लावला, असं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिलं. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांनी हादरली. १२ बॉम्बस्फोट झाले होते. हिंदूबहुल भाग लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी मी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. ती स्फोटक भारतात कुठेही तयार होत नाहीत. त्यांची निर्मिती पाकिस्तानच्या लाहोरमध्येच होते. त्यामुळे या स्फोटांमागे पाकिस्तानच असल्याचं माझ्या लक्षात आलं, असं पवारांनी सांगितलं.
एकूण १३ स्फोट झाले आणि तेरावा स्फोट एका मुस्लिमबहुल भागात झाल्याचं विधान मी जाणीवपूर्वक केलं. कारण धार्मिक तेढ निर्माण करणारे गट, संस्था दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात होत्या. तसा प्रकार राज्याला परवडणारा नव्हता. मुस्लिमबहुल भागातही स्फोट झाल्याची माहिती दिल्यानं तसा प्रकार घडला नाही. स्फोटांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगानं मला १३ व्या स्फोटाबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी मी हेच कारण त्यांना सांगितलं होतं. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवणं, कायदा सुव्यवस्था बिघडू न देणं हे त्यावेळी महत्त्वाचं होतं, असं पवार म्हणाले.