मराठा-ओबीसी आरक्षण वाद, शरद पवार यांनी केली ही मागणी

0

मुंबई,दि.21: मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत.

मराठा-ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारची कोंडी झाल्याचे चित्र आहे. अशातच शरद पवार यांनी राज्यातील महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारने मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला पुढाकार घेण्याची गरज आहे. एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे.’

आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोनही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here