Sharad Pawar On BJP-MNS: भाजपा मनसे युतीबाबत शरद पवारांचं सूचक विधान

0

जळगाव,दि.१५: Sharad Pawar On BJP-MNS: भाजपा मनसे युतीबाबत (BJP MNS Alliance) शरद पवारांनी सूचक विधान केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकत्याच घेतलेल्या जाहीर सभेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंनी भाजपा विरुद्ध एकही शब्द काढला नाही. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका पाहता भाजपा मनसे युतीबाबत (BJP MNS Alliance) तर्क लावले जात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं विधानं केलं आहे. राज्य सरकारविरोधात मनसे भाजपासोबत जाऊन कडवं आव्हान उभं करणार का? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला असता शरद पवारांनी केलेलं सूचक विधान मनसेच्या भविष्यातील राजकारणाविषयी तर्क-वितर्कांमध्ये भर घालणारं ठरलं आहे.

मनसे जागा निर्माण करेल का?

जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनसेच्या राजकीय भवितव्याविषयी देखील भाष्य केलं. सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता आत्तापर्यंत तसं काही झालं नसल्याचं शरद पवार म्हणाले. “ते मला सांगता येणार नाही. आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये”, असं शरद पवार म्हणाले.

“तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे”, असा टोला देखील त्यांनी लगावला.

राज ठाकरे हिंदूजननायक?

दोन दिवसांपासून राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक म्हणून करणाऱ्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता मनसेला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार असल्याचं शरद पवार म्हणाले. “त्यांची जी भूमिका दिसली, त्यात पहिल्यांदा त्या सभेतलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं दिसतंय की त्या रस्त्याने जायचा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. प्रत्येक पक्ष आपला कार्यक्रम ठरवत असतो. त्यांनीही तसा कार्यक्रम ठरवला असेल”, असं शरद पवार म्हणाले.

मनसे भाजपा युती?

दरम्यान, यावेळी सध्या चर्चेत असलेल्या भाजपा-मनसे युतीविषयी माध्यमांनी विचारणा करताच शरद पवारांनी ते शक्य असल्याचं नमूद केलं आहे. “मी सांगू शकत नाही. पण दोघांचंही लक्ष सध्या सत्तेत असणाऱ्या संघटनेवर आहे. त्यांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here