मुंबई,दि.१७: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते भेटल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) भूमिका स्पष्ट केली आहे. काल (दि.१६) अजित पवारांसह सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बंड केल्यानंतर प्रथमच सर्व नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री व नेतेमंडळींनी सर्वेसर्वा शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी पवारांना केली. मात्र या आवाहनावर पवार यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. उलट त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर व चिन्हावर दावा सांगितला आहे. पक्षाध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे कागदोपत्री दाखवीत पक्षाचे नाव व चिन्हावर अजित पवार यांनी दावा केला. यामुळे पवार काका-पुतण्यातील राजकीय संबंध आणखी ताणले गेले. या पार्श्वभूमीवर अजित पवार व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे सर्व मंत्री व काही वरिष्ठ नेत्यांनी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. पाया पडून पवारांचे आशीर्वाद घेतले आणि झाल्या प्रकाराबद्दल या सर्व नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पक्ष एकसंध ठेवून अधिक मजबूत करण्याकरिता आशीर्वाद देण्याची विनंती पटेल यांनी केली.
जो प्रकार घडला त्यातून मार्ग काढण्याची विनंतीही सर्व नेत्यांनी केली. भेटीस आलेल्या सर्व बंडखोर नेत्यांना पवारांनी चहा पाजला. मात्र बंडखोर नेत्यांच्या विनंतीवर किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रफुल पटेल, छगन भुजबळ आदींनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर किंवा मांडलेल्या मतांवर शरद पवार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. पवारांचा एकूणच नूर लक्षात घेता बंडखोरांनी लवकर निरोप घेणे पसंत केले.
शरद पवारांनी भूमिका केली स्पष्ट | Sharad Pawar
दरम्यान, या भेटीनंतर पवार यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘‘आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठींबा देऊ शकत नाही. आपली ती भूमिका नाही. यापुढेही पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे,’’ असा संदेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.