शरद पवारांच्या वक्तव्याने राजकारणात संशय निर्माण होण्याची शक्यता

0

सोलापूर,दि.16: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात केलेल्या वक्तव्याने संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. मी कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे, या शरद पवारांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी माढा तालुक्यातील कापशी येथील एका शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी हे सूचक विधान केलं आहे. राज्यात आणि केंद्र सरकारशी शेतकरी वर्गाचे काही प्रश्न आहेत, अशा प्रश्नांची चिंता करू नका. जी काही दुखणी असतील, त्यांची सोडवणूक प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन करू, सध्या मी कुठे नाही, पण त्याची काही चिंता करू नका, कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेतीच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलू आणि हे प्रश्न मार्गी लावू, असंही पवार म्हणाले, पण आपण कुठेही नसलो तरी सगळीकडे आहोत, या वक्तव्यामुळे पवारांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न निर्माण झालाय.

जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई निवडणूक आयोगात गेली. एकीकडे राष्ट्रवादीमध्ये ही लढाई सुरू असतानाच अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी झाल्या. नुकतंच दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीमध्ये एकत्र आलं होतं. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं, विचारधारा बदलली असली तरी आमचं नातं कायम आहे, अशी भूमिका पवार कुटुंबाकडून वारंवार मांडली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतरही पवार कुटुंबातील नात्यांचा ओलावा कायम असल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळेंनी भाऊबीज साजरी केली. बारामतीच्या काटेवाडीतील फार्म हाऊसवर संपूर्ण पावर कुटुंब दाखल झालं होतं. विशेष म्हणजे अजित पवारांच्या निवास्थानी आयोजित भाऊबीज कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर या कौटुंबीक कार्यक्रमाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र पक्षातील फुटीनंतरही नात्यातील जिव्हाळा कायम असल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंब काटेवाडीत दिवाळी एकत्रीतपणे सांजरी करतं. यंदा दिवाळीवर राष्ट्रवादीतील फुटीचं सावट होतं. अशातचं पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारल्यामुळे भाऊबीजेच्या कार्यक्रमाविषयी शंका उपस्थित केली जात होती. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र येणं टाळलं असलं तरी कौटुंबीक कार्यक्रमात मात्र ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here